या आयुष्याचे काही खास नियम आहेत, अगदी कुठलाही अपवाद नसलेले. अंबानी पासून तर अगदी रस्त्यावरच्या एखाद्या भिकाऱ्या पर्यंत सगळ्यांनाच ते लागू होतात- अगदी कोणीही त्याला अपवाद नाही.वय वाढत तसं शरीर थकत जातं, पण केवळ इच्छा शक्तीच्या जोरावर काही लोकं निसर्गाला आव्हान देत वाढत्या वयाकडे पाठ फिरवण्याचे प्रयत्न करतात, पण ते काही फार काळ जमत नाही. कधी तरी एक दिवस येतो आणि मग शरीर आणि मन एकमेकांपासून फारकत घेतं, आणि मग शस्त्रक्रिया, किंवा औषधोपचार करून शरीर जगवावं लागतं.
शरीर आणि मन यांचं द्वंद्व सुरु झालं की यात नेहेमी मनाचा विजय होतो, आणि शरीर खचतं. मन लपवून ठेवता येतं पण शरीर तर नाही ना लपवून ठेवता येत? मला वाटतं की हेच ते कारण असावं की ,काही ठरावीक वयात आपण थोडं जास्त अंतर्मुख होतो, आणि मग इतरांशी न बोलता आपलं मन हे स्वतःशीच जास्त बोलायला लागतं – हे होतं तुम्ही एकटे असतांना, आणि त्याच वेळेस तुमचे मन मागे वळून भूतकाळात डोकावत असतं.
भूतकाळात डॊकावुन पाहिल्यावर कधी तरी सुंदर स्वप्न दिसतात, तेंव्हा तो भूतकाळ तर खूप आवडतो. अगदी शाळेतले मित्र मैत्रिणी, लग्नापूर्वी बायको बरोबर ( ती बायको नसतांना ) बरोबर चोरून फिरल्याचे दिवस , ह्या आनंददायक आठवणी, तर कधी तरी आपण कोणाशी कसे वाईट वागलो होतो ते पण आठवत. कुठल्यातरी गोष्टीचा मनात एक विनाकारण आकस ठेवून आपण ’ तसे ’ का वागलो हे भूतकाळात डोकावून तिऱ्हाइताच्या दृष्टीने पाहिले की स्वतःची चूक समजते, आणि प्रसंगी स्वतःचीच लाज पण वाटते.आज ती वेळ गेलेली आहे, आणि आपण ज्या व्यक्तीशी तसे वागलो ती व्यक्ती आपल्यात नाही, आणि अगदी मनापासून क्षमा मागायची इच्छा होत असली , तरी पण आता ते शक्य नाही, हे लक्षात आलं की वाईट वाटतं. आपल्याला तसे वागायचा खरंच अधिकार होता का? ह्याचं उत्तर स्वतःलाच सांगितल्यावर, आणि आपल्या वागण्याची खंत वाटते आणि डोळ्यात पाणी येतंच.
आपण कधी काळी केलेल्या चुकांकडे पाठ फिरवून दुर्लक्ष केल्याचा आपला प्रयत्न, आपली चूक असतांना पण इतरांवर आपण जास्तच ऑफेन्सिव्ह’ होऊन केलेले आरोप- म्हणजे स्वतःचा कमकुवतपणा लपविण्याचा तो प्रयत्न नव्हता का? होय! स्वतः वरच्या केल्या गेलेल्या खऱ्या आरोपांना उत्तर द्यावे लागू नये म्हणून समोरच्या व्यक्तीवर केले निरर्थक बिनबुडाचे आरोप करून त्या व्यक्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याची माझी स्ट्रॅटेजी खरंच योग्य नव्हती, आणि त्या मुळे मी समोरच्या अतिशय जवळच्या व्यक्तीला खूप मानसिक त्रास दिलाय याची जाणीव पण होते, आणि आपण तसे का वागलो याचे आश्चर्य पण वाटते.
आयुष्यात नाते संबंध झिडकारणे सगळ्यात सोपे, आणि जेंव्हा तुम्ही ते झिडकारत, तेंव्हा स्वतःबद्दल उगाच काही तरी अवास्तव कल्पना करून घेतलेल्या असतात आपण. आज वयाची काही वर्ष संपली आहेत, उरलेल्या वर्षांबद्दल कसे जातील याची काळजी वाटत ही असतेच. आपण जसे वागलो, तसेच जर आपल्याशी आज कोणी वागले तर?? हा प्रश्न तर मेंदूला नेहेमीच कुरतडत असतो.
शेवटी काय तर, वेळ कधीच पुन्हा मागे नेता येत नाही, घड्याळाचे काटे पण कधीच थांबवता येत नाहीत, स्वतःच्या कर्तबगारीवर तुम्ही पैसे कमावून आपलं भवितव्य घडवतो आहे असा विचार करू शकतो, पण के्वळ पैसे कमावणे म्हणजे भवितव्य घडवणे नाही.भूतकाळातील एकही क्षण ( तुम्ही मिस केलेले ) त्याला पुन्हा अनुभवायला मिळत नाही – हा एक शाप आहे, आणि याच शापाचे ओझे अश्वत्थाम्याच्या डोक्यावरच्या जखमे प्रमाणे सांभाळत आमची पिढी ही आयुष्य जगते आहे.
जन्माला येतांना डॊळ्यात घेऊन येणाऱ्या अश्रु घेऊन आपण या जगात येतो, वयोमाना प्रमाणॆ शरीराच्या अवयवांनी जरी आपली साथ सोडली, किंवा एके काळी जवळच्या असलेल्या लोकांनी , किंवा जगातल्या सगळ्या आप्तेष्टांनी जरी साथ सोडली, तरी दैवाने दिलेले ते सोबती म्हणजे अश्रू मात्र आपली साथ अगदी इमाने इतबारे करत असतात. ते केवळ अश्रूच आहेत की तुम्हाला तुमच्या अडचणीच्या वेळी मनातल्या भावनांचा निचरा होण्यास मदत करतात, आणि मग पुन्हा नवीन आव्हानं पेलण्यास मनाला तयार करतात. म्हणून आपली खरी संपत्ती म्हणजे अश्रू- कधीच न संपणारी!
हे असे विचार का मनात यावे? मला एकच सांगायचंय, जर कोणाची क्षमा मागायची असेल तर योग्य वेळ कुठली??अगदी आजची वेळ योग्य आहे, अजिबात वेळ करू नका, आणि क्षमा मागून मोकळॆ व्हा.